तुझ्याविना क्षण
क्षणांविना मन अडते
सरतेशेवटी मनाविना
माझे जगणेच टांगते
असावा असा समुद्रकिनारा
असावे फक्त तू अन मी
वेचण्या धन डोळ्यांतले
असावे पारखी.. तू अन मी
आहेच तसा मी
वरकरणी जगणारा
गप्प गप्प राहून
खूप काही करणारा
पाण्याच्या थेंबातही मी तुला पाहिले होते
सळसळत्या वाऱ्यालाही भान तुझे राहिले होते
दरयाखोरयात वाहिलेल्या आकांत सादाला
मी कणाकणाने झिजलेले प्रतिसाद पाहिले होते
मी तुझ्यात राहिलो
राहताना पहिले
असे दिस सुखाचे
सरताना पहिले
खूप काही बोलायचं होतं
सगळं काही राहून गेलं
वाहते दिवस सोबत म्हणून
मन माझं वाहून नेलं
तुझ्या प्रेमळ आठवणींना
रात्रीस केव्हातरी जाग आली
क्षण ना क्षण जोडत गेले
अन रात्रीची सकाळ झाली
दिवसांमागून वर्षे सरली
एकच उल्का शोधत होतो
त्या वळणांवर वावरताना
माझा गलका उगाच होतो
कुठे होतीस तू
मला परत वाटलं नाही
तू कधी परत येशील
हेच मला पटलं नाही
मनी माझ्या साठलेलं
खूप काही वाटलेलं
बेभान असं एक पिलू
सैरावैरा सुटलेलं
निवांत क्षणी एखाद्या राती
खोलवर खळबळ चालायची
गावभर फिरून आलो कि
झोपच मला रागवायची
उगाच का ग सांग मला
सोन्यात हिरा जडवायचा
उगाच का बघून तुला
गाव मला चिडवायचा
- रोहित
No comments:
Post a Comment