Thursday 28 June 2012

प्रवास..

हिरवी झाडं.. वाऱ्यावर डोलणारी शेतं.. नारळीच्या, केळीच्या बागा.. काळी माती.. पाटाचं वाहणारं पाणी.. निळं अथांग आकाश..
कुठं गोरंढोरं.. शेळ्या मेंढ्या.. कुठे कौलारू घरं, काटेकुटे, बाभूळ.. कुठे दगडी दोन चार बंगले.. बाजूला निलगिरी.. मधेच ढगांचा वेगळा मेळ.. कुठे दूरवर दिसणारी जमीन-अस्मानाची पोकळी.. कुठे ऊनपावसाची खेळी..
आणि दूरवर वाहणारा कच्चा पक्का एकेरी डांबरी रस्ता.. रस्त्यावरून चालणारी, सायकलवरची तशीच कच्ची पक्की वाटणारी लोकं.. त्यावरून सुसाट वाहणारी गुलबर्गा एस.टी. आणि त्यात मी!
दूरवर नजर टाकावी.. जेवढी जमेल तेवढी.. इथे तो पृथ्वीचा गोल जाणवतो.. अगदी चौखूर दिशांचा!
मग आठवतो.. शेवटचं कधी मी असं काही पाहिलं होतं ते.. खरंच आठवत नाही..
पाहत राहतो बाहेर.. हाताची घडी करून.. कोपरावर डोकं ठेऊन.. पाहत राहतो.. हे निसर्गाचं देणं..
कुठेतरी संबंध जाणवतो इथल्या मातीचा.. इथल्या वासाचा.. आणि माझा.. कुठेतरी.. त्याशिवाय ही ओढ नाही.. ह्या मातीतलाच मी.. ह्या मातीतच जाणार..
थोडी दुनियादारी.. थोडा मध्ये काळ जाणार.. पण शेवटी फिरून मात्र इथेच येणार.. शेवटी फिरून मी इथेच येणार..

- रोहित

Monday 25 June 2012

पाऊस..

हेच तर हवं होतं ना तुला..
जे कालपर्यंत मला अशक्य वाटलं..
काल.. काल खूप पाऊस झाला माझ्या घरी..
खूप वादळे आली.. झालं एकदाचं थैमान वाऱ्याचं..
आणि आता.. आता निरभ्र वाटतंय सगळं..
अगदी तुला पाहिजे होतं तसंच..
आज.. आज मी थोडं तुझ्या कलेनी घेतोय..
आज मी तुला पाहिजे तसाच येतोय..
आज मला नाकारण्याचा तुला अधिकार नाही..
आज तुझ्यात मिरवण्याचा माझा इरादाही नाही..
आज.. आज मी थोडी तडजोड केलीये..
आज तुला तुझ्या मनासारखं झालेलंय..
पण आजही तू जराशी गुमसुमच वाटतेस..
माझं असं येणं अपेक्षित नसावं तुला..
पण मी आलोय आता..
आज तुला पर्याय नाही..
आज मी तुला पाहिजे तसाच आहे..
तरीही मी तुला जरा नकोसाच आहे..
देईन.. तुलाही वेळ देईन मी..
जसा तू दिला काल माझ्यासाठी..
काल पाऊस माझ्या घरी होता..
आज थोडा तुझ्या घरी असेल..
आज थोडा तुझ्याही घरी असु दे..

- रोहित

Sunday 24 June 2012

शब्द..

माझ्यातला रसिक ओळखून आणि मला बोलतं करताना पाहून फोन वर माझा बॉस म्हणालेला एकदा..
रोहित.. तुझ्या आणि माझ्यामध्ये जर काही असतील तर ते शब्द आहेत.. !!
वाह.. कधीच विसरू शकणार नाही  मी हे शब्द..
शब्द.. एक निराळंच भन्नाट माध्यम..
जे फक्त content पोचवतं.. दिसणं नाही..
आणि मला ते बऱ्यापैकी आवडतही..
माझी एक मैत्रीण .. chat वरची..
केवळ बोलण्यानी एकमेकांना बांधून ठेवलेलं.. दिसण्यानी नाही..!!
पण.. याचे थोडे तोटेही असतात..
जे लोक केवळ शब्दांनी बांधले गेले ते त्यांच्या इतकं अंगवळणी पडलं की सत्यात प्रकटणं कुणा एकाला जड जावं.. आणि जातंच!!
मला माझ्या बॉस बाबतीत गेलं आणि मैत्रिणीला माझ्या बाबतीत..
हे accept करणंही खूप अवघड गेलं..
हे जड जातंच.. ह्या दोन जगातला difference वाटतो तितका सोपा नाही..
आणि माझ्या यादीत एक नवा नियम पडून गेला..
अश्या शब्दांच्या दुनियेत एक तर जास्त विहार करू नयेच.. खऱ्या जगाचा आधार असल्याशिवाय..
आणि जर केलाच तर त्या व्यक्तीची खऱ्या जगातील अपेक्षाच करू नये... अजिबात करू नये..

- रोहित

Saturday 23 June 2012

भेट..

माझं बोलणं.. हसणं..
आज नको अपेक्षित करूस..
फक्त एवढं समजून घे..
आज सर्वस्व दिलंय तुझ्या हवाली..
मला माझ्या कलेनी मिसळू देत आज..
मिसळू देत या अथांग नयन सागरी..
काही एक विचारू नकोस..
काही एक सांगू नकोस..
फक्त अनुभव घे.. ह्या अनुभूतीचा..
अनुभव घे.. उंच पसरून हात आकाशी..
आज तू माझं आकाश आहेस..
आज तू माझी जमीन आहेस...
काही एक सीमा नको..
नकोत काही बंधनं..
झुगारून दे सर्व काही..
सामावून घे आज मिठीत..किमान आज..
आज जर नसेल त्या मिठीत अर्थ नाही..
होऊ दे आज भेट आकाशी..
दोन स्वगतांची..
काही एक बोलणं नको..
काही एक ऐकणं नको..
फक्त असेल पाहणं..
माझं तुझ्यातलं.. अन तूझं माझ्यातलं..
आणि तेवढाच एक असेल दुवा..
आज.. किमान आज..

- रोहित

Wednesday 20 June 2012

निवेदिता..

निवेदिता.. आधी कुठल्याश्या शाळेच्या पुस्तकात धड्याचं नाव ऐकलेलं.. भगिनी निवेदिता.. आणि फारसं common नसलेलं त्यामुळे धड्याबरोबरच संपलेलं असं नाव..
पण एकदा या नावाची मुलगी सत्यात आली.. मैत्रीण म्हणून.. शाळेच्या एका वर्षासाठी..  इयत्ता आठवीसाठी..
इयत्ता आठवी.. कुणी जर विचारलं.. तुला आठवणारं किंवा तुझं आवडतं वर्ष कोणतं रे.. माझं उत्तर असेल.. आठवी.. मला माझी कुठलीच इयत्ता एवढी आठवत नाही जेवढी माझी आठवी आठवते..
ह्या वर्षात मी पहिल्यांदाच वर्गाचा monitor झालो होतो.. ह्याच वर्षी माझ्या दोन्ही आजोबांचं वाईटही  झालं.. याच वर्षी मी खूप दंगाही केला.. आणि जे काही क्षण घालवले.. ते संस्मरणीय असेच होते..

आमच्या कारखान्यावरची सगळी पोरं गावातल्या शाळेतच जायची.. शहरातली लांब पडते म्हणून.. आणि मारकुट्या बापाच्या डोळ्याखालीच राहतील म्हणूनही..
पण आम्ही थोडे हुशार.. थोडे समजणारे.. थोडे असणारे.. गावातल्या पोरांच्या नादी लागून गल्ल्यातून गोट्या खेळण्यापेक्षा पोराला शहरात पाठवलेलं केव्हाही बरंच.. एक typical आई-बापांचा विचार.. असे शहरात शाळेला घातलेले काही घासू, काही हुशार पोरं.. तर काही इशांत अवस्थी..

आमच्या कारखान्याला एक बस असायची.. शहरात जाणारी.. त्याला २ पास.. एक विद्यार्थी लाल रंगाचा पास तर एक प्रौढ पांढऱ्या रंगाचा पास..
पोरं पोरं धिंगाणा घालत जायची.. पोरींची कुचूकुचू चालायची.. माझी ३ वर्ष झाली शहरातल्या शाळेत.. पण routine मधे फारसा फरक काही आठवत नाही..

मग ८ वी उजाडली.. कुणी सोडून गेलेलं आठवत नाही पण २, ३ वाढलेलीच .. त्यात एक बाली, एक कानडी पोरगा आणि निवेदिता..
बाकीच्या दोघांचं कौतुक एवढं नाही कारण ती सगळी कायमची इथलीच.. निवेदिता पुण्याची.. धनकवडीला राहिलेली.. हुशार मुलगी.. अभ्यासातही.. आणि व्यवहारातही.. बाकीच्या दोन भावंडांवर खूप प्रेम करणारी..
भावाचं विमान तुटलेलं म्हणून स्वतःचं विमान कुर्बान करणारी.. लहान वयात माणसं कशी जपावी अचूक ओळखणारी.. निवेदिता..
तिच्या भावाच्या वाढदिवसाला तिच्या वडिलांनी शहरात जाणारी मंडळी गोळा केलेली.. ओळख करून दिलेली.. 'तू आता ह्यांच्याबरोबर जायचं हं'.. काळजीवाहू बापाची पुढची तयारी.. आम्ही कॉलनीतली पोरं जरा गांगरलेलीच.. एक तर gift मनात आलो तर देणारी.. इथे return gift मिळालेली.. आमच्या लक्षात राहणारा वाढदिवस तिच्या घरी झाला..

दोन दिवस ती सुषमा, बाली आणि माझ्याबरोबर फिरली.. त्या सगळ्या पुढे.. मी आपला मागे.. आम्हाला इकडे बल्लू आणि सागरची सवय.. आम्ही पोरं पण करंटीच.. नेहमी कुणीतरी, कुणाशीतरी बोलत नसायचं.. त्यावेळी माझं नेमकं ह्या दोघांशी वाजलेलं.. त्यामुळे मी सुषमा आणि बालीच्या ओळखीनं नव्या ग्रुप मधे घुसालेलो.. घुसायच्या प्रयत्नात असलेलो.. ते दोन दिवस जरा formal गेले.. आणि नंतर.. नंतरची आठवते फक्त मज्जा..

आम्ही त्या एक वर्षात खूप चांगले, खूप स्मरणीय असे क्षण घालवले.. भांडलो काय.. फडे डॉक्टरच्या वर्हांड्यात खेळलो काय.. एकत्र अभ्यास काय केला.. वर्गाचे दोघे monitor काय झालो.. वर्गात तर आम्ही एकमेकांचे भाऊ-बहिण सांगायचो.. तिला बरं जावं म्हणून.. मला आठवतंय.. वर्गात सुरु होणारे special इंग्लिश क्लासेस तिच्या आग्रहानेच मी लावलेले.. आणि तिथे जे शिकलो ते आजही माझ्या कमी येतंय..
monitor असताना कसले तरी पैसे गोळा करायचे होते.. तिचा गणित अचूक असलेलं.. आणि माझं सरांकडून ढिसाळ कारभार म्हणून ओरडा खाल्लेलं.. अजून आठवतंय..
एकदा सागरच्या आईकडून माझ्यासाठी तिनं ओरडा खाल्लेला.. हो.. ते ही आठवतंय..
पळत जाऊन एस. टी. काय पकडायची.. ते दिवसच लई भारी..!!
त्यात नंतर नंतर मी आणि निवेदिता खूप जवळचे मित्र- मैत्रीण झालेलो.. सुश्माही म्हणायची.. तुला काय.. तुला तीच जवळची.. अर्थात तेव्हा तिचं आणि निवेदिताचं वाजलेलं असायचं..!

इतकी छान मैत्री.. मी पुन्हा मुलांच्यात बोलावूनही गेलो नाही.. मी त्यांच्यातलाच झालो.. ८ वीचं वर्ष संपलं.. माझी ८ वीलाच सुरु झालेली सेमी-इंग्लिशही  सुटली.. पुण्याला flat चा ताबा मिळाला.. आता पुढचं शिक्षण पुण्याला होणार होतं.. जाता जाता शेवटचं लोभसवाणं वर्ष संपलेलं होतं.. जाताना थोडं वाईटही वाटलेलं.. थोडं पुण्याचं कुतूहल असलेलं.. निघायच्या अगोदर निवेदिता सोडवायला यावी खूप वाटलेलं.. आणि बल्लू आलेला.. ती तर कधीच गावाला गेलेली.. परत कधी आलो तर भेटेल..असं मनात म्हटलेलं.. आणि पुण्याला सुटलेलो..

परत आठवतंय.. सुट्टीत कारखान्यावर आलेलो.. बल्लुला, सागरला भेटलेलो.. पण तिचं घर मोठ्या बापाचं.. तिच्या घरावरून गावच्या मंदिरात गेलेलो.. तिच्या दाराकडे पाहत पाहत.. घरी का नाही गेलो.. आता खरंच कळत नाही.. एकदा घराबाहेर गेलेलो.. तेव्हा आईनं सांगितलेलं.. निवेदिता येऊन गेलेली.. परत तिच्या घरी धाडस करून गेलेलो..तेव्हा ती घराबाहेर गेलेली.. तिच्या आईला सांगितलेलं.. तिला खालच्या बागेत पाठवा! मला भेटायचंय तिला!! आणि ती न आलेली.. माझी तिची भेट परत झाली नाहीच...

आज इतकी वर्ष झाली.. ८ ..९ .. १० .. १० आणि ५ १५..१६.. १७... ९ वर्ष झाली.. पण फारशी मनातून न विसरलेली.. अगदी कालचीच गोष्ट वाटतेय इतकी जपलेली.. अलीकडेच facebook ला दिसलेली.. तिकडेही famous झालेली.. पोरगीच मस्त! जाईल तिथं राज्य करणारी.. डॉक्टर झालेली.. निव टोपण नाव पडलेली.. ओळख काढायला गेलेलो पण जुनं आठवायला घाबरलेली.. तेव्हा आपण ८ वीत होतो रे.. काही कळत नव्हतं.. आता तू कसा असशील.. कसल्या स्वभावाचा असशील.. आणि फारसं जाणून न घेता बोलणं तोडणारी.. मागची पाऊलं रेतीत विरणारी आणि पुढची हृदयात रुतवणारी.. निवेदिता..

- रोहित

Tuesday 19 June 2012

गोडवा..

माझी मामी म्हणालेली एकदा...
खोलवर मनात रुतून बसलंय ते आता...
नुसतं प्रेम असून चालत नाही... ते दाखवावं लागतं!
विचित्र वाटतंय ना.. मलाही वाटलेलं..
पण शाश्वत सत्य आहे ते..
तुम्हीच बघा ना..
दोन भावंडांमधलं प्रेम.. बोलतही नसतील भले एकमेकांशी..
पण प्रेम असतं.. खरंच असतं..! दाखवलं जात नाही..
Busy नवऱ्याची गत तीच.. प्रेम दाखवायला वेळ नाही.. आणि त्यामुळे बायकोला संशयातून!
वेळ काढायला हवाच.. प्रेम आहे तर प्रेम दाखवायला हवंच..
आता नसेल तरी प्रेम दाखवणारा वर्ग तरुणाईत मोडतो! ते गणितच वेगळं!!
पण गोडवा हवाच.. अगदी १००% हवा!
 
- रोहित

सर..

आज शेवटी कानावर पडला तो मंत्र..
Success हवं तर दोन गोष्टी रक्तात मिसळू द्या..
एक म्हणजे Patience आणि दुसरं Passion..
ज्यांनी ऐकवला त्यांनी हेही ऐकवलं..
जिथं Passion तिथे Patience कसा असू शकेल..
असतो!! असू शकतो... त्यातच यश आहे..!
अव्याहतपणे काम करणारे शास्त्रज्ञ.. उत्तम उदाहरण
एकच काम सतत करत राहायचं.. हे नाही तर ते.. ते नाही तर हे..
आणि ते सापडतंच.. तसं आपल्यालाही सापडेल!!
अगदी पाहिजे ते.. आणि त्यासाठी पाहिजे फक्त वेडेपणा..
एखादी गोष्ट सतत सतत करत राहण्याचा वेडेपणा..
आणि एकदा ती गोष्ट रक्तात उतरली की संपलं..
पाहिजे ते मागा मग.. पाहिजे ते.. मिळेल!.. मिळणारच!!

- रोहित

Monday 18 June 2012

Chat life दोस्ती..

मी मित म्हणायचो तिला..  स्मिता वरून स्मिते झालेलं.. नंतर मित होऊन थांबलेलं.. वर्षानुवर्षांची जुनी मैत्री.. chat वरची!! चालायचंच.. जमाना जरा वेगळा आहे.. मैत्रीचाच एक नवा प्रकार उदयास आलेला.. :)
तर अशी ही मित.. गोड बोलणारी.. कडू बोलणारी.. आंबट गोड स्वभावाची..
ही दोन वर्षे तिच्यासोबतचे क्षण कसे गेले.. खरंच कळले नाहीत.. इतकी मस्त अशी मित..
पण का कुणास ठाऊक.. तिला कधी भेटायचंच नव्हतं मला.. जरा उशीराच समजलेलं मला..
मित्राकडून कळलेलं मला.. Despo ठरवलेलं तिनं मला.. पण त्यानंतर बरंच पाणी वाहून गेलेलं पुलाखालून..
कमीत कमी आता ती आपल्यातली गोष्ट बाहेर जाऊन देणारी नव्हती.. एवढी तर नक्कीच आवाक्यात आलेली.. पण तिचं न भेटणं माझा तणाव वाढवणारं ठरलं.. आपलं स्थान काय नक्की हिच्या जगातलं.. काहीच अंदाज नाही ना..
बरं कारण सांग म्हटलं तर म्हणे मी माझ्या बाबांना नाही सांगितलं काही आजवर (तर तू कोण!)..
नक्कीच तुझा बाबा नाही!
असो.. मग एवढ्यात बोलणंच कमी केलंय जरा.. जिथे २ दिवस मुश्कील वाटायचे तिथे १-२ आठवडे गेलेत chat विना..
तिच्यापेक्षा मलाच जास्त त्रास झाला त्याचा.. आणि जाणवलं की आजकालची मुलंच जास्त senti झालीत.. मुलींपेक्षा.. she was completely rock steady .. आणि इथे आमची पानं मुळापासून हललेली.. तिला कारणही विचारणं जमलं नाही..
मग आपणच कशाला मागे पळा मग? आणि after all.. मला काही पाहिजे होती तर फक्त एक भेट!! थोडी प्रेम कहाणी वाटेल पण तसं काही नसलेली.. दोघांचाही weekpoint badminton!! त्या निमित्ताने का होईना पण मी आता सुडाने पेटलोय! Despo तर Despo.. ह्या वेळेस आपलंच खरं करणार आहे मी.. भले न बोलली तरी चालेल मग.. ह्या chat life दोस्तीतून बाहेर पडायचंय आता.. तुझ्याबरोबर जरा खरं जगायचंय.. तुला काहीही वाटो मग.. काहीही..

- रोहित