Monday 15 December 2014

प्रेम म्हणजे..

पुरे झाले चंद्रसूर्य
पुरे झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
अकरावीतली प्रेमाची कविता काय मन लाऊन पाठ केलेली. :)
फक्त त्या हरिणीसाठी.. तिनं ऐकावी म्हणून..
काय ते निर्मळ वय होतं, आणि त्या वयात झालेलं ते कोवळं प्रेम.
काहीच वावगं म्हणावं असं मनी नव्हतं.
वाहवत जायचं वय होतं ते.. वाहवत गेलं.. बरं झालं.
कायम लक्षात राहील अशी आयुष्यभराची शिदोरी मिळाली.
प्रेम एकतर्फा असो कि दोन्ही बाजूनी झालेलं,
त्याचं खास असणं मुळीच कमी होत नाही.
ती एक भावना असते. तिचं उमलणं फक्त महत्त्वाचं.
Fandry पिक्चर मधला जब्याच आठवा ना :)
फक्त झुरणं हवं. प्रेयसीवर मनापासून केलेलं प्रेम हवं.
मग तुम्हाला कशाचीच गरज नाही. अगदी प्रेयसीची सुद्धा !
कुण्या कवीला कधी विचारून तर बघा, कोणत्या वयात वाहवत जाऊन खूप कविता केल्या ते.
उत्तर येईल ते याच कोवळ्या वयात :)
त्या वेळची प्रेयसी मनात घर करून जाते.
आपलं पाहिलं प्रेम आपण कधीच विसरत नाही.
ती आपल्या हृदयाच्या मखमलीत जपून ठेवलेली आठवण असते.
आयुष्य सुंगंधीत करणारं अत्तर असतं.
हेच एक प्रेम असतं त्याला कसलाच तराजू तोलत नाही.
ना पैसा, ना घरदार.. काहीच नाही.
फक्त निष्पाप हृदयाने डोळे झाकून केलेली एक गोड चूक असते.
आणि हे असं चुकून झालेलं प्रेम जेवढं मनापासून केलं जातं ना..
ते आयुष्यात कधी पुन्हा एकदा होईल.. शक्यता कमी आहे :)

- रोहित