मी अव्यक्त आहे,
आसक्त नाही.
तुला भेटावेसे वाटते,
पण विचारात कोणतेही,
गैर कृत्य नाही.
अगदी हातात हात घालून,
बोलावेसे वाटते,
तुला सोबत घेऊन,
चालावेसे वाटते,
पण तुझ्या मनात नसतांना,
तुझ्या मनाविरुद्ध वागणारे,
माझे रक्त नाही.
खूप स्वप्ने रंगवली आहेत,
जी सांगायाचीयेत तुला..खूप इच्छा सजवल्या आहेत,
ज्या मागायच्याहेत तुझ्याकडे..
पण तुझ्या नकार भरल्या नजरेपुढे,
माझी हिम्मत नाही.
तुझा रस्ता माहीत असतांनाही,
मी आडोश्याला उभा राहत नाही.
तू पुढे चालतांना कधी,
तुझ्या मागे चालत नाही.
कारण नसतांनाही कारण काढून,
तुझ्याशी बोलायला येत नाही.
इतरांकडेही तुझा विषय टाळतो,
शक्यतो तुझ्या बाबतीत मौनच पाळतो.
तुला आठवत ठेवण्याचा,
अजिबात अट्टाहास करत नाही.
पण तू दिसलीस कि मनात वादळ उठतं,
चेहऱ्यावर एकही तरंग दिसत नसेल कदाचित,
तरी तुला बघतांना मनी काहूर पेटतं.
पण मी बोलत फक्त नाही.
हल्ली माझ्या अव्यक्तपणालाही भाषा आलीये,
इतरांसाठी तो प्रश्नाचाही विषयही असेल,
आजकाल तुझ्या नकार भरल्या नजरेतही संभ्रम दिसतो..
पण मला बघून तू कधीही रस्ते बदलू नकोस,
आपल्या प्रेमाला त्रास देईन एवढा मी उन्मत्त नाही.
- अमोल
No comments:
Post a Comment