Wednesday, 31 October 2012

क्षणभंगुर..



सगळं किती क्षणभंगुर झालंय ना आज
प्रचंड volatile असं काही
situation मधून पण काय झपझप बाहेर येतात लोकं
इतकी adaptive कि बास
त्यामुळे कशात गुंतणं, प्रेमात अडकणं, संकटात सापडणं..
प्रश्नच येत नाही
alternatives शोधले जातात
प्रचंड alternatives..
आजच्या पिढीची सोयही आणि फुटकं नशिबही
परिस्थितीशी सामना आला कि मार्गच बदलायचे
त्यामुळे कण्याची झालेली कंदमुळे..
इतकं उपरी जीणं..;
वीट यावा असल्या थोडक्यात जगण्याचा..
मुरणं म्हणजे कशाशी खातात असे पडलेले केविलवाणे प्रश्न
प्रेमाची तर मंडईच झालेली..
खरे अर्थ अवशेषांसारखे पुस्तकात सापडतात फक्त..
खरं सांगू
जन्माला येण्याचा हा काळच फसला मुळी
हि वेळ सगळं उरकून निघायची होती
परत जाण्याची होती
७०-७२ मधील तरुणाईची होती
summer of 69..!!
म्हणजे डोळ्यांनी आज ही पडझड पाहताना एवढा तरी आनंद राहिला असता
कि कितीही नकोशे असले तरी आपले इथले क्षण
क्षणभंगुर.. फक्त क्षणभंगुर

- रोहित

Monday, 29 October 2012

आंधळी कोशिंबीर..


हो हो.., आम्हाला प्रेम पाहिजे!!
याचा अर्थ तुम्हाला काय वाटते,
फक्त तेवढंच जमतं का आम्हाला
हे वयच असे की कुणीतरी लागतं,,
काळजी घेणारं,,,,
जगाच्या रहाटगाड्यात नुकतेच उतरलेले
गांगरलेले, धडपडलेले..
बाहेरून मजेत दिसतील,
पण आतून रक्ताळलेले..
एक पाहिजे कुणीतरी विचारणारं
आपलं... जखमेवर फुंकर तेवढीच..
आणि पुरे होईल तेवढं सुद्धा
खूप झालं एवढंच, दिखावा का असेना..
नाहीतर फिरतात मग तसेच
उघड्या जखमेने..,
जाते चिघळत मग, निरंतर..
जोपर्यंत त्याला दवा नाही..
खरे मासूम तर हे असतात ...
आत वेगळं आणि बाहेर वेगळं..
आणि त्यात परत पडताळणी..,,
पुन्हा पुन्हा..
ही पण निरंतर चालणारी..
अंत पाहणारी..
जगाचा नियमच तो,
जखमी.. अजून जखमी होणार,.
त्याला कोणाचा इलाज नसणार..
लपवणारा लपवत जाणार..
आणि हसतानाही डोळे पुसणार..
सगळीकडेच आंधळी कोशिंबीर..!!

- रोहित

तुझ्यात माझं जगताना...


किती वेदना होतायेत ना..
मीही तडफडतोय..
अगदी तुझ्या इतकाच
लांब राहणं किती अवघड असतं ना
असं डोळ्यांसमोर असताना...
आणि टीचभर हसणंही जड जातं मग
काळीज असं खचताना..,,
आपलं ते हातचंच असतं
कळायचं ते.. माझ्याशी तुझं वागताना
आणि मग मीही मन मोडायचो नाही
तुला फुलात असं जपताना..

किती जपलं ग मी
जाणवलं का तुला..
मागे वळून तरी पहायचंस..
कळलं असतं तुला..
माझी एकट्याचीच झालेली दमछाक......
तुझी गाडी मस्त कलंदर
कुणाची लगाम नसलेली,,,
आणि माझी मागून ससेहोलपट
सारं सुखात टिपण्याची...

तसं एवढंही काही वाईट न्हवतं
निभावून नेता आलं असतं
जुळवून घेता आलं असतं..
पण यावेळी मीच हात आवरला..
म्हटलं बघावी तुझी गोडी
माझ्यातली.. या नात्यातली
पण काय झालं.. कुठे फसगत झाली
काहीच कळलं नाही...
की मीच वेडा होतो
तुझ्या हातचा बाहुला होतो..
माझं स्थानच मला उमगेना..
पहिला ते आजचा दिवस
माझी चूकच मला समजेना ..
माझं जग आता कोसळत चाललंय...
तुझ्यासाठी बांधलेलं ..
आजवरचं प्रेम निखळत चाललंय..
दोघांसाठी सांधलेलं ..
आणि एवढं सगळं होताना
सगळं आपल्या हातानेच पाडताना..
जे घाव होतायेत .. न भरुन येणारे वाटतात
नाही.. आता परत येणार नाही
आणि तु ही येणार नाहीस
तेवढा विश्वास आहे मला
तुझ्या पाषाण हृदयावर..
तुझ्यावाचून आता राहावं लागेल
या रखरखत्या उन्हात..
चालेल..! पण तुझ्या सावलीत पुन्हा येणे.. नाही.. नाहीच....

- रोहित

फक्त जरा किंमत असुद्या..


खरंच..
इतकं सोपं असतं का गं..
आयुष्यात कुणाला एवढं स्थान देणं..
आणि तेवढ्याच सहजपणे ते हिरावून घेणं..
सोप्पं असतं ना फार ..
कुणी आला .. कुणी गेला..
काय फरक पडतो ..
हो ना.. 
चूक तुमची नाहीच मुळात..
चूक आमचीच ..
एवढं प्रेम..  एवढी काळजी..
नको एवढं प्रेम उधळायची सवय..
अंगलट येणारी ...
अतिपरिचयात अवज्ञा करणारी..
पण आम्ही असेच असतो गं,
आतूनबाहेरून सारखेच ..
आडपडदा वगैरे नसणारे ..
ओळखायचं काम खरं तुमचंच..
जवळ करायचं कामही तुमचंच..
खरा खोटा ठरवायचं..
शेवटचा अधिकार तुमचाच..
बरंच काही असतं तुमच्या हातात..
फक्त जरा किंमत असुद्या..
बस.. पुरे आहे आम्हाला..
आणखी काही नको 
आणखी काही नको ..

- रोहित

दुपार..


दूर कुठे जावं..
एकटंच बसावं..,
भल्या दुपारी...
कुठल्याश्या.. गर्द झाडाखाली..
थोडं वेळ द्यावा..
मीच काढलेला.., माझ्याचसाठी..
थोडे सोडावेत निश्वास..
फसवे का असेना..
अन हुंकार.. विसावलेले..
विसरावेत मग उणे दुने..,
आणि माझेच कालचे गुन्हे..
निरखावेत.. धगधगते निखारे
मग थोडं स्मित..
सावलीत असल्याचं..
दोन घोट पाणी..,
आणि विसावून जावं मग...
क्षणभर..
फक्त क्षणभर...

- रोहित

Saturday, 27 October 2012

आपला चहाचा कप..

तुला आठवतं ते आपलं नेहमीचं हॉटेल
आणि तेच सर्वात  मागचं टेबल ..
त्यावर आज थोडी धूळ साचलेली.
हळुवार हात फिरवला ..तर  ..
तेच तू काढलेलं आपलं छोटंसं गाव .....आणि  त्यावर लिहिलेलं दोघांचे नाव....! 
अन ..मन माझं पुन्हा एकदा मागे  गेलं..
अगदी एकदम सर्वकाही काल घडल्या सारखं
जाळीदार पानावर पहाटेचं दव पडल्यासारखं
मला तुझं प्रेम कळावे  म्हणून तू केलेला शब्दांचा खेळआणि  सर्व समजूनही मी राहिलेलो अबोल ....! 
मला आवडणारा ड्रेस तू घातलेला  ..
पण जाणवू दिला नाही मी प्रसंग माझेवर बेतलेला ..
मलाही समजत  होतं..
मी आलेवर ..मी येते म्हणणारी तुझी मैत्रीण हुशार ..आणि तू  दिसलेवर माझे मित्रही होणार लगेच पसार .. 
रोज अजून थोडावेळ थांबू ना  .. बोलणारी तू ...
अन घरी जाण्याची घाई करणारा मी ..
दोघामध्ये एकच  घेतलेला तो चहाचा कप ...!तोही केविलवाणे हसत बघायचा माझेकडे ....! 
डोळ्यात  डोळे घालून ..आयुष्यभर साथ देशील ..
असे विचारणारी तुझी भावूक नजर ..
प्रतीक्षा  माझ्या उत्तराची ..
अन ..उत्तर ऐकताच ..केलेली घाई अश्रू   लपवण्याची ....!! 
तुला नाही म्हणून गेलो तुझे पासून दूर ..
घरी  आलेवर भरून आला अश्रूंचा पूर ..
आता चहाच्या चटक्याने भानावर आलो ...स्वप्नं सारे भूतकाळात विसरून गेलो .. 
पण ..
या सगळ्यातून बाहेर आलेला  मी ..
कायम तुझेसाठी कुढत आहे ..
आणि त्या चहाच्या कपात अजूनही ..तुझंच  प्रेम शोधत आहे .....!!

पाखरू होऊन पाखराशी बोलायचं..


मन मोकळं, अगदी मोकळं  करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं  आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण  आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर  पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं,  अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात  काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी;
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या  उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू  होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक
गोड  गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं!

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने  चालायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी  बोलायचं.

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो  आपला पाऊस,
न्हात रहा.

झुळझुळणार्‍या झर्‍याला
मनापासून  ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं  आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन  पाखराशी बोलायचं.

कारण यातले तुला काहीच ठाऊक नाही!


काल एकटाच समुद्रकिनारी फिरता असताना
मी तुझे नाव  त्या रेतीवर लिहिले ..
माझ्या नावासमोर ..
आणि स्तब्ध होऊन बघतच राहिलो ....!
...मस्त सूर्याची सोनेरी किरणे पडली होती त्यावर ..
मधूनच उसळून एक लाट आलीच ..
पुसू नये म्हणून जवळ जवळ अडवाच पडलो ..
पाणी नाही पुसू दिलं ते नाव .....!
थोडावेळ राहू दिलं ..आणि
नंतर हलक्या हाताने पुसून टाकलं ...
स्वतःपुरतेच  मानसिक समाधान ..
आणि आनंद घेतला .....!
एकटाच होतो त्यावेळी समुद्रकिनारी ...
सगळीकडे शांतता ..
पण ..मावळता सूर्य ..
उसळणाऱ्या लाटा ..
आणि पडलेले  शंख शिंपले
आणि मऊ आणि थंडगार रेती ला मात्र
हे प्रकरण ठाऊक झाले  खरे
त्यांचे एक बरे होते
निमूटपणॆ पाहत होते बिचारे
खुप आधार  वाटला या सर्वांचा
वाटले आपण व्यक्त झालो कोणासमोर तरी...!
एकदम  हवेत तरंगत होतो त्या रात्री ..
घरी येऊन लताची रोमांटीक गाणी ऐकली ...
किती  उकळ्या फुटत होत्या म्हणून सांगू...?
त्या रात्री ....
एक पत्र  लिहिलं तुला एकांतात..
झोपच नाही लागली त्या रात्री ....!
अजूनही  तसंच आहे ते पत्र ..
वाचतो अधूनमधून तुझ्या आठवणीत ..
पण आता ते  जीर्ण झालाय वाचून वाचून ..
अगदी तुझ्या-माझ्या सारखं....!

सर्व  काही अजूनही आठवतंय ..
अगदी काल घडल्या सारखं ..
तुला आठवायचे काहीच  कारण नाही ...
कारण यातले तर तुला काहीच ठाऊक नाही ....!

पाऊस..


हेच तर हवं होतं ना तुला..
जे कालपर्यंत मला अशक्य वाटलं..
काल.. काल खूप पाऊस झाला माझ्या घरी..
खूप वादळे आली.. झालं एकदाचं थैमान वाऱ्याचं..
आणि आता.. आता निरभ्र वाटतंय सगळं..
अगदी तुला पाहिजे होतं तसंच..
आज.. आज मी तुझ्या कलेनी घेतोय..
अगदी तुला मी पाहिजे तसाच येतोय..
आज मला नाकारण्याचा तुला अधिकार नाही..
आज तुझ्यात मिरवण्याचा माझा इरादाही नाही..
आज.. आज मी थोडी तडजोड केलीये..
आज तुला तुझ्या मनासारखं झालेलंय..
पण आजही तू जराशी गुमसुमच वाटतेस..
माझं असं येणं अपेक्षित नसावं तुला..
पण मी आलोय आता..
आज तुला पर्याय नाही..
आज मी तुला पाहिजे तसाच आहे..
तरीही मी तुला जरा नकोसाच आहे..
देईन.. तुलाही वेळ देईन मी..
जसा तू दिला काल माझ्यासाठी..
काल पाऊस माझ्या घरी होता..
आज थोडा तुझ्या घरी असेल..
आज थोडा तुझ्याही घरी असु दे..

- रोहित

Thursday, 25 October 2012

क्लासिक..

कुणा कुणाला असं वाटतं रे.. जे क्लासिकपण होतं काल परवापर्यंत.. आपल्या आजुबाजूला..
ज्यात आपण रमलो.. अगदी मनापासून.. मनाची कुठलीही कवाडे न झाकता..
समरसून गेलो ज्यात.. असा जो सुवर्ण काळ.. आपल्या सर्वांच्या आयुष्यातला..
जुने आठवणारे क्षण.. किती छोटेही का असेनात.. पण मनात कोरले गेलेले..
कुणाचा प्रेमळ हात.. कुणाची प्रेमळ साथ.. मस्त होतं काहीतरी..
बबल्या,चिंकी, पिंकीची कहाणी.. अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत हवं होतं.. क्लासिक असं काही..
शाळेची घंटा.. लुटूपुटूच्या मारामाऱ्या.. आपल्या हुशार फुशारक्या..
पोरांच्या कॉप्या.. गुरुजींच्या काठ्या.. सारं काही क्लासिक..
सायकलवरचे दिवस.. खिशात नव्हता पैसा.. तरी गाव विकत घ्यायला निघालेली स्वारी..
उगाच मारलेल्या फेऱ्या.. २० पैश्याच्या गोळ्या.. त्याच्या चौघात वाटण्या.. सारं सारं क्लासिक..
उन्हाळ्यात पडलेली उन्हं.. झाडाखालच्या सावल्या..
कुठं रमलेल्या रम्म्या.. गोट्यांचे पडलेले डाव.. सारं सारं क्लासिक..
गावाच्या टेकडीवरचं हनुमानाचं मंदिर..
मंदिराचा कट्टा.. कट्ट्यांवरची लोकं.. गप्पा कुटणारी पोरं.. सारं सारं क्लासिक,,
रविवारच्या मालिका.. अलिफ लैला.. शक्तिमानच्या..
बुडवलेली अर्धी शाळा.. बुडवलेल्या शिकवण्या.. मास्तरचं ओरडणं..
मटका लागलेल्या परीक्षा.. चुकून पडलेले मार्क.. सारं कसं क्लासिक..
लेन मधल्या कहाण्या..वेणीमधल्या पोरी.. आपल्याला एकीचं आवडणं.. नेमकं काय न समजणं..
सारंच काही क्लासिक..
गावाकडच्या कहाण्या.. गावाकडचं राहाणं.. मनात गोडी साठलेलं.. क्लासिक.. फक्त क्लासिक!!

- रोहित

Tuesday, 23 October 2012

शाप..

एक तर मी पडलो प्रेम कवी. त्यामुळे रद्दीवाल्याकडे जसे सगळे पेपर हमखास येतात तसेच माझे बरेचसे मित्रही माझ्यापाशी ह्या विषयाची रद्दी घेऊन येतात. त्यांचे अनुभव सांगतात. हृदयापासून आलेले असल्यामुळे बरेचशे worth listening असतात. काही तुम्ही कुठे चुकताय हे दाखवणारे असतात. काही पुढच्याला ठेस मागचा शहाणा ह्या धाटणीचे असतात. पण का कुणास ठाऊक. माझ्यापाशी आजवर आलेला एकही प्रेमात यशस्वी नाही.. आणि ह्यात माझा दोष नाही.!!
तर बहुतांश लोकांचा प्रॉब्लेम हा कि त्यांना मुलींचा स्वभावच समजत नाही. तिच्या मनात नेमकं काय आहे हे
जाणण्यासाठी पोरं मनस्ताप करून घेतात. तिच्या वागण्याचं कारण हे एखाद्या अवगड गणितापेक्षाही अवघड वाटतं त्यांना. खरं आहे ते. बाकीचे ताप खूप असले तरी मुली मनमौजी असतात.
एका जवळच्या मैत्रीणीनं केलेला उलगडा असा कि मुली एकट्या कधीच नसतात. त्यांना नको इतकं प्रेम मिळणारच असतं. मिळतंच जातं. त्यांना नको असताना सुद्धा!
मग त्या सरावतात असल्या वातावरणात आणि मग बिनधास्त बनून जातात. मग हा मनमौजीपणा त्यांची हत्त्यारं आणि आपल्यावरचे वार बनून जातात.
पोरं पडली साधी भोळी. त्यांना कोणीच जवळ करत नाही. पोरीनं दाखवलेल्या टिकलीएवढ्या ओलाव्यात त्यांना जिव्हाळा दिसू लागतो. आणि मग पोरी टारटूर करायलाच बसलेल्या असतात. चूक कुणाचीच नाही!!
माझं पोरांना एकाच सांगणं (आणि स्वत:लाही!) कि खरं प्रेम करणं, होणं ह्या गोष्टी गोष्टीतच राहिल्यात आता.
तुम्हाला वाटेल pesimistic आणि अजून काही काही. आपलं नशिब आजमावून या मग बोलू.
सगळं सगळं सगळं infatuation आहे आज. फक्त infatuation! अगणित प्रेम कविता.. अगणित चारोळ्या केलेला, स्वभावाचे सरकत जाणारे पैलू डोळे उघडे ठेऊन पाहिलेला माणूस आहे मी.
महिनाभर लांब राहा अगदी तना मना धनाने.. विसरताल तुम्ही!! अगदी ९९ % लोकांना लागू होईल हे.
ह्या गोष्टींना आयुष्यात स्थान एका timepass पेक्षा जास्त देऊ नका. पोरांनो खास तुमच्यासाठी.
त्या दिवशी मी तिथं होतो हे ऐकायला. अहोभाग्य माझं. गणपतीचे दिवस होते. आणि आमचे आवडते सर काही सांगत होते. म्हटलं तर महत्वाचं. म्हटलं तर काहीच नाही. बोलत होते अगदी मनापासून असं काही.
"हि जी ढोल वाजवणारी मुलं असतात मिरवणुकीत, कशासाठी रे ढोल वाजवतात हि पोरं? पोरींवर impression च पाडायचं असतं ना?! हो तेच तर कारण असतं.. ह्या मिरवणुकात डोळ्यातल्या डोळ्यात किती कहाण्या घडून जात असतील. कुणा मुलीला त्याचं ढोल वाजवणं आवडून जात असेल. तर कुणा मुलाला तिची नववारी साडी आवडून जात असेल. पण पुढच्या क्षणाचं काय.. ती कहाणी एका चौकातल्या वळणावरच संपते! इतकी क्षणभंगुर अशी ही कहाणी. आणि समजा झालंच जर लग्न त्या दोघांचं तर उद्या मुलाच्या admission ला पैसे नसतील तर भांडताना तिला तुमचं ढोल वाजवणं आठवणार नाही. आणि वैतागून मनात चरफडताना तुम्हालाही तिची नववारी साडी आठवणार नाही. किती क्षणभंगुर असतं ना हे सगळं.
तुम्ही दिवसभर किती खपला याला काहीच महत्व नसतं. At the end of the day, what matters is the money. फक्त पैसा!! कटू सत्य आहे पोरांनो पण जितकं लवकर समजताल तेवढं चांगलं आहे"..
काहीतरी ठरवा. पाहिजे तेवढा वेळ घ्या. हे आयुष्य खूप मोठं आहे. पण ठरवलेल्या ध्यासाशी एकनिष्ठ राहा.
ध्येय वेडे व्हा. पोरींच्या मागे धावते मन हा निसर्गाचा शाप आहे. तुम्ही ध्येयाकडे divert करा त्याला. मुली तुमच्या मागे असतील. अगदी १००% ;)

- रोहित

Sunday, 21 October 2012

पाऊस..

खुप वाट पाहिली मी आज..
पावसाची..
तुझी जवळ असण्याची..
तुझं आणि पावसाचं
एक नातंच बनून गेलंय आता..
त्याच्या येण्याचं तू एक
निमीत्तच बनून गेलंय..
तो आला की आठवतात मग..
तुझे माझे आठवण थेंब..
ओंजळीत मग साठवत असतो मी,
मावतील तेवढे क्षण..
.. मातीवर पडणारा आवाज,,
मन बेचैन होऊन जातं..
तुझ्याजवळ घेऊन जातं..
किती दूर आलीस तू आज..
किती एकटा पडलोय मी आज..
मी वाट पाहतोय आज..
पावसाची..
तुझी जवळ असण्याची..

- रोहित

अशी कशी ग तू..

किती साधी ग तू,
ना सजनं ना मुरडनं,
ना लटके झगडणं,
किती सच्ची ग तू..
जे काही असेल ते आतून सजलेलं,
सकाळचं ऊन जसं पावसात भिजलेलं..
किती मन लाऊन जगणारी तू,
किती जीव लाऊन जगणारी तू,,
तुझे ओझरते देखावे जगणं शिकवून जाणारे..
तुझे हसते नजारे हसणं शिकवून जाणारे...
किती वार्यासारखी तू,
किती पाण्यासारखी तू,
वाहत जाणारी .. आपल्याच कलेनी,
वाहावत नेणारी .. स्वैर ओढ्यासारखी..
एवढा का हेवा वाटावा,
तुझ्या जगण्याचा..
तुझं जग बघण्याचा..
एकदा तुझ्या डोळ्यांनी ही दुनिया बघावी म्हणतो..
ती सुंदर भासेल.. नव्हे असेलच!
तुझ्या हातात हात घेउन डोळ्यात हसावं म्हणतो..,
पाणी गालांवर असेल.. किंवा रुसेलच...
तुझ्या असण्याचा आनंदोस्तव जगायचाय..
तुझ्या हसण्याने, तुझ्या सोबत असण्याने...

- रोहित

एक कविता प्रेमासाठी..

तुला माहितीये..,तू प्रेमात कधी हरतोस
तू दिलेल्या शब्दांना तू स्वतःच जेव्हा फिरतोस
केलंस जर प्रेम, तर काळीज पिळून दे
तिलाही ते पोचु दे, तुझ्यापासूनच कळून दे
म्हणू देत वेडा, इथे आहेत कोण शहाणे
परवडणार नाही तुला, तुझे गप्प बसून राहणे
जे श्रेष्ट ते सरळ कधी न्हवते
आणि जे सरळ ते कधीच श्रेष्ट नसणार
तुझ्या हाताची मुठ तुला करावीच लागणार
थोडं तरी तिच्यासाठी लढावंच लागणार
युद्धच नाही त्या गड जिंकल्याचा काय आनंद..?!!
लढत रहा
प्रेमाचे तीर मारत रहा
लायक तर तू होशीलच रे
थोडं नालायक होऊन तर पहा
एकदा तू धीर धरून तर पहा

- रोहित

बगळ्यांच्या माळा..

हा रोज उगवणारा सूर्य पहा..
पहाटेचं रूप पाहून वाटणार नाही,
हा करोडो वर्ष जगलाय!!
उगाच नाही देवाचं स्थान आहे त्याला..!
आकाशात उडणारी पाखरे पहा..
आणि म्हणून दाखव मग,
कंटाळा आलाय या सगळ्यांचा,,
मनात तर येउ दे..
ओठातलं लांबच राहिलं ..
कधीतरी येत जा इकडे..
कसं जगायचं ते शिकण्यासाठी..

- रोहित

अशीच तू..

तुझं ते भोळं रूप
ते निरागस सौंदर्य
ना कुणाची पर्वा फक्त
एकवटलेलं कौमार्य

तुझा तो गोड स्वर
ती वेगळीच अदा
तुझ्या नकळत झालेले
गाव तुजवर फिदा

ती पापण्यांची फडफड
अन ओठांची अलगद हालचाल
सगळं विसरून तीरासारखी
एकलक्ष्य नजरचाल

तुझे बांधलेले केस
जणू रेशीम मखमलीतले
हरवून पाहता आठवले
मोरपंख ठेवणीतले

तुझे भिरभिरणारे डोळे
त्या डोळ्यातील खोली
सगळंच काही भारावलेलं
नजरेतही लाली

तू आहेस तरी कोण
की वेडाचा हा आभास
आणि एवढं सगळं होऊनही
तुला काहीच ना तपास

- रोहित

चमचाभर साखर!!

या रुक्ष जगात, या वैशाख वणव्यात,
जर काही सुखदायक असेल, शीतल असेल.,,
तर तो तुझा सहवास..,
तुझं केवळ असणं..
डोळ्याला केवळ एक image दिसणं,
lol  hehe करत तुझं हसणं,
बास.. खूप पाऊस पडून जातो त्या दिवशी..
आभाळ अगदी मोकळं होऊन जातं....

त्या माझ्या कोपऱ्यात,
एकटाच खुदखुदत असतो,
तिचं म्हणणं फुदकतो, एकटाच..
एकदा मीच "observe"लं,
वेड्यासारखं हसताना..
साली जणू साखरच दळत असते,,

मित्र म्हणतात,
जाऊन भेट एकदा..
पण मीच घाबरतो,
तुला गमवायची भीती, ही साखरेची सवय न मोडणारी आहे आता..
परत त्या उन्हात तुझ्या सावलीशिवाय,,
हा दोन घटकेचा पाऊसच बरा!!
जास्त झाली की किंमत कमी होण्यापेक्षा.. ही चमचाभर साखर पुरे!!

- रोहित

कधी कुणी विचार करून प्रेम करतो का??

कधी कुणी विचार करून प्रेम करतो का
आणि केलंच तर त्याला प्रेम म्हणतात का
कधी कुणाचा पगार बघून जीव जडलाय का
आणि जडलाच असा जीव तर त्याने जीव दिलाय का(पटकन द्यावा!!)
तुला भेट द्यायला तरी पैसे आहेत का
तुला भेटी द्यायला तो दुकानदार आहे का
अरे प्रेमाचा अर्थ तरी इथे उलगडलाय का
इथेही साली दुनियादारी पुन्हा कलमडली का
काही घेण्यासाठीच इथे व्यवहार होतात का
अन झालाच तर दोघे शेअर बाजारात नसतात ना
निस्वार्थ प्रेम म्हणजेच एकतर्फी असते का(जोरात विचार व्हावा)
कारण एवढंच एक ठिकाण जिथे returns fix  नसतात
बरोबर ना?

- रोहित

(अकरावी मराठीतलं) प्रेम म्हणजे...

पुरे झाले चंद्रसूर्य
पुरे झाल्या तारा
काय करू जेणेकरून
वाहील प्रेमाचा रानवारा

मोरासारखा छाती काढून उभा राहीन
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहीन
कुठे दूर दऱ्याखोऱ्यात
दोघे खोपटे बांधून राहीन

शेवाळलेले शब्द आणिक
यमक छंद करतील काय?
..शब्दांशिवाय दुसरे आणिक
करण्यासारखे आहेच काय

जागा तर आहेच की
येउद्या तर वेळ
अक्षरांच्या भातुकलीचा
ती आली की संपेल खेळ

प्रेम म्हणजे ताक जसं घुसळत जाणं
प्रेम म्हणजे लिंबू होऊन "मिसळा"त जाणं

प्रेम करीन पेट्रोल सारखं
किमतींनी भडकलेलं
आणि एवढं वाढून सुद्धा
टाकीमध्ये ओतलेलं..

शब्दांच्या धुक्यामध्ये अडकणार नाही
election च्या झेंड्यासारखा फडकणार नाही

उधळून देईन तुफान सारं
पानावरती साचलेलं
प्रेम करीन तीरासारखं
काळजामध्ये घुसलेलं


- कुसुमाग्रज आणि मी :)

आणि हे सारं...सारं तुझ्या प्रेमाने

एक अशी निळी सकाळ
होईल तुझ्या येण्याने
सळसळतील पाने अंगणातली
तुझ्या निखळ हसण्याने

पसरतील सोनेरी किरणे
येतील कवडसे दाराने
आणि तेही दिपून जातील मग
तुझ्या लाख तेजाने

उमलतील फुले आडोशाची
पडतील सडे पारिजातकाचे
तू जाशील वेचायला
तर भिजवेल तो दवाने

मग मेघ गर्जून येतील
पुन्हा रानात बरसून जातील
वेडी लोकं म्हणतील
"ह्म्म्म आला पावसाळा.."
आता त्यांना कसे हे ठाऊक असणार
इथला मेघही लाजतो तुझ्या प्रेमाने

- रोहित

रोज-रोज दुपारी असं परत परत घडणार....

नेहमीसारखा दिवस चालू होणार
दोन buttons दाबून डब्यासमोर बसणार
आज काय करायचं थोडंफार सुचणार
सकाळ मजेत जाणार, दुपार जरा लांबणार..
आजूबाजूचेही मग आपल्याच जगात रमणार
Available  लोकांची List समोर दाटणार
त्यात नेमकी तू उठून उठून दिसणार
बोलावसं तर जीवापाड वाटणार
पण मागले रुसवे फुगवे मनामध्ये साचणार
उघडलेली window परत बंद करणार
मोठ्या मुश्किलीने तुला नजरेआड करणार
दुसऱ्या कामामध्ये रमतोय, स्वता:लाच भासवणार
तासा-अर्ध्या तासात ते सुद्धा जमणार
पण रोज-रोज दुपारी असं परत परत घडणार....

- रोहित

जुने दिवस..Malgudi Days :)

खरं भूतकाळात जगणं मला कधी पटलंच नाही
जुन्या दिवसात वाटायचं काही ठेवलं नाही
आज का सगळं गोळा होऊन आलंय
मन त्या दिवसात त्यातलंच होऊन गेलंय

तेव्हा ते वाटायचे कसले हे दिवस
आत्ता ते जाणवतंय गेले ते दिवस
होते जे हात गळ्यात गावभर
ओळखतील ना ते हात, अडखळणार तर नाहीत

ज्यांच्याशी भांडलेलो, त्यांना जाऊन भेटायचंय
ओळखलत का सर मला, हसत हसत विचारायचंय
सापडतील ना ते आज अजूनही तिथे
मनातली घरं काही जागा सोडत नाहीत

एवढ्याश्या गोष्टी तोंड भरून सांगायचे
मंदिरात, चावडीवर माणसं जशी भेटायची
आज जर गेलो तर असतील का ते तिथेच
मनातली माणसं काही कट्टा सोडत नाहीत

रंगलेली नाती, फुललेल्या कथा
डोळ्यातल्या डोळ्यात फिरायची
कळतील ला आज तेव्हाची निर्मळ नाती
मनातले रंग काही फिके पडत नाहीत

- रोहित

तुझ्या काही आठवणी..

तुला पाहिलं की आठवतं मला
श्रीमंत मिडास राजाची ती राजकुमारी
तीसुद्धा बहुधा तुझ्यासारखीच दिसली असावी
अंगाची लव ना लव सोन्याने बहरणारी

तुला पाहिलं की आठवण येते मला
भरती आलेल्या सागरातील तुफानी वादळाची
तो सागरही बहुधा तुझ्यासारखाच दिसला असावा
आसुसतो जो चांदण्यात, शपथ आहे भेटीची

तुला पाहिलं की आठवण येते मला
पाण्याने शिंपलेल्या कोवळ्या लाल गुलाबाची
तो गुलाबही तुझ्यासारखाच दिसला असावा
ओठांवरती बरसणारी ओढ खुळ्या पावसाची

तुला पाहिलं की आठवण येते मला
नेहमीच डोळे मिटलेल्या हसऱ्या बुद्धाची
तो बुद्धही तुझ्यासारखाच दिसला असावा
न मागूनही मिळालेली सर स्वर्गसुखाची

तुला पाहिलं की आठवण येते मला
परींच्या राज्यात स्वच्छंदी बागडणाऱ्या पाखराची
ते पाखरुही तुझ्यासारखाच दिसलं असावा
सगळं मिळूनही नूर काहीच न मिळाल्याची

तुला पाहिलं की आठवण येते मला
पालापाचोळयांनी माखलेल्या दूरवर गेलेल्या रस्त्याची
त्यावरील वाटसरू माझ्यासारखाच दिसला असावा
एकटाच थांबून वाट पाहणाऱ्या एका सोबतीची
- रोहित

निमित्त!!

हे ही तितकंच खरंय..
जे सुंदर मुखडे आठवून जग हरवून जातं.. काही बरसून जातं
असं काही सुंदर, हरवून नेणारं.. शेक्सपिअर पासून शाहजहान पर्यंत
इतक्या अप्रतिम की ज्या प्रेरणेने त्या बनल्या त्याही फिक्या पडाव्या..
एक निमित्त होते ते चेहरे... क्वचित प्रसंगी ते स्वभाव!!
जे घडवून गेले नकळत स्वर्गीय काही..
ते श्रेय त्यांचे नाही... नसावे....
त्याचे मोल त्या 'निमित्ताला' कळाले असते मग..
आठवावी मोनालिसा..कोण होती ती..
निमित्त..फक्त एक निमित्त!!!


- रोहित

म्हटलं चला...

म्हटलं चला सहज एक फोन करून बघू
काय कसं चाललंय,सहज विचारून बघू
महिन्यांवर महिने उलटले मधे जरी
आवाजातल्या ओलाव्यात जीव भिजवून बघू

तसं फोन करून काही बदल घडणार नव्हता
फोन करून बोलणार काय, विषय सापडत नव्हता
का त्या शब्दांसाठी मन एवढं आसुसल होतं
तिचा साधाच call ,  तिला फरक पडणार नव्हता

नुसतंच झुरणं झालं होतं,मागे फिरणं झालं होतं
डोळ्यातल्या डोळ्यात खेळण्यापलीकडे जास्त काही झालं नव्हतं
बोलण्याची हिंमत तुझ्या डोळ्यात हरवून बसलो होतो
हिंमत झाली जागी,पण तुला हरवून बसलो होतो

म्हटलं जावं विसरून पण number तुझा save दिसतो
एक दोन बटनांच्या अंतरावर तू उभी दिसते
विसरू तरी कसा,number  delete करू  कसा
नेमका ह्याच कामामध्ये mobile माझा फसतो

म्हटलं चला करूच एक, होईल काय ते बघू
आवाजातला कंप जरा hold  करूनऐकू
तुझी तशीच असेल का माझी जी स्थिती
पाच-दहा मिनिटांचा गारवा, मनात साठवून बघू

- रोहित

गारवा..

काहीतरी राहतंय..
रोज झोपताना वाटतं
खूप बरसून जाईल एवढं आभाळ मनात दाटतं
तरी क्षण चालून जातात
मन चालत नाही
डोक्यामध्ये किड्यांशिवाय काहीच फिरत नाही
तेवढ्यात कुठून 2 lines सहज सुचून जातात
तेवढ्यात कुठून 2 lines सहज सुचून जातात
काही राहिलेल्या अंगणावरती सडा मारून जातात
शब्दांमागून सुरु होतो शब्दांचाच हा खेळ
मन शांत सुखावून जाईल अशी पुन्हा येते वेळ
चक्क डोळ्यांसमोर थकवा कूस पालटून जातो
झोपण्याआधी  पानांवरती कुठून गारवा येतो

- रोहित

जेव्हा कधी कुणी आवडून जातो..

जेव्हा कधी कुणी आवडून जातो
जेव्हा कधी कुणी आवडून जातो
प्रेमाचा तीर हृदय छेदून जातो
जगात फक्त दोघंच असल्याचा भास होतो
तिच्या येण्याचा असा काही गोड त्रास होतो

उंचच उंच पाळण्यावरचा हर्ष होतो
तिच्या येण्याच्या वाटेकडे डोळे गुंतून जातात
वर्षानुवर्षे धूळ खात पडलेलं हृदयसिंहासन
झटकून साफ होतो!
तिच्या येण्याचा असा काही गोड त्रास होतो

जेव्हा कधी कुणी आवडून जातो
रुक्ष माळरानावर श्रावण बरसून जातो
भिरभिरणारे डोळे स्वप्ने गुंफू लागतात
 कोऱ्या आकाशी चांदण्या शिंपून जातात
जेव्हा कधी कुणी आवडून जातो
असा काही गोड त्रास होऊन जातो

- रोहित

Saturday, 20 October 2012

प्रेम.. आणि आजची पिढी

मागून मागून मागतोय काय तर
फक्त एक संगत
एक हवीहवीशी संगत
आणि काही घेण्यापेक्षासुद्धा
बरंच काही देण्यासाठीची
एक प्रेमळ संगत..
आतून जाणवतंय
काहीतरी दबून राहिलेलं
भरभरून वाहिलेलं
डुंबून जाईल एवढं प्रचंड असं काही
खरं कुणीतरी डुंबावं यासाठीचंच
पण दिवस असे हे फुकाचे
दोन वेगळ्या विचारांचे
एक देण्यासाठी आतुरलेला
तर दुसरा झुरवण्यासाठी
आसुरी आनंद घेण्यासाठी
जीवाची तडफड पाहण्यासाठी..
असा एकच विचार दोघात फसलेला
आणि कुणीच सुखी नसलेला
बिघडलेली तारुण्याची घडी
अशी हि आजची पिढी
अशी हि आजची पिढी..

- रोहित

Thursday, 18 October 2012

Smiley faces..

I've seen lots of pain
I cried alone lots of times
Behind every smile, I know in me
What I've gone through..

I know the wrinkles
behind every smiley curves..
I'll gather them all,
and put together in my bad times,
To stand up and fight against falls..
I know the people,
And their fake fates
Their smiles..Just to keep the things
I know them inside!
I'll just let them smile and make them believe
to believe that I cant.. just to make them watch
Just let me make them watch..
With smiley faces.. with smiley curves

- Rohit

Sunday, 7 October 2012

प्रेम नावाची शाळा..

प्रेम.. प्रेम ही भावना समजणं, हे प्रेमच आहे हे उमजणं वाटतं तितकं खरंच सोपं नाही.
आजवरच्या आयुष्यात चार वेळेला असं वाटलं की हां, आता मी प्रेमात आहे.
चारही वेळेला ते attraction च होतं.. प्रेम आहे हे सांगणं हिम्मतीचा भाग कधीच नव्हता.
मुळात प्रेम आहे हे सांगणं गरजेचंच नाहीये. ती एक formality  आहे.
चणे फुटणे खाल्ल्यासारखे "मी तुझ्यावर प्रेम करतो" हे, "ये, line देतेस का?" एवढाच बालिश प्रश्न आहे.
उगाचच प्रेम असल्याचा आतून आवही आणतो. स्वतःचीच फसवणूक करतो. प्रेम नाहीचे हे.
माणूस पूर्ण आपलं बनतो प्रेमात. भलेही लांब राहूदे, कधीतरी भेटणार तो या आशेवर टिकून असतं दुसरं माणूस.
समोरच्याची कशी जिरवायची आता, कसं त्याला/तिला जागा दाखवायची हे आजच्या प्रेमात बसणारे फंडे आहेत.
ते कितपत प्रेम आहे हे करणाऱ्यालाच माहित असावं.
परवाच एक wallpaper  पाहिला. प्रेमात एका मुलाची आणि मुलीची विचार करण्याची पद्धत दाखवलेली त्यात.
मुलगा आता ती काय करत असेल, माझाच तर विचार करत नसेल ना आणि अजून काहीबाही विचारांनी झुरताना दाखवलेला.
आणि मुलगी क्रूरपणे म्हणताना दाखवलीये.. I  wanna play a game!!! इतका पटला ना तो wallpaper.. शप्पथ!! खरं आहे ते.
काय क्रूर आनंद मिळतो ह्या विचारांच्या मुलींना देव जाणे.. star plus आणि अजून काही बाही कार्यक्रमांचा परिणाम आहे की काय कुणास ठावूक. पण ताक पितानाही फुंकून प्यावं इतकी गत झालीये ही आजकाल.. असो!!
तर मुद्दा हा की खरं प्रेम मिळालं तर आनंदच आहे.. नाहीतर खोट्यावरती  तर सगळी दुनिया चाललीये..!! आपल्यालाही असंच चालवून घ्यावं लागणार.. आपल्यालाही असंच चालवून घ्यावं लागणार..!!

- रोहित

Tuesday, 2 October 2012

Rishtey..

Relations असेही असतात
नवीनच होतं मला
आभारी राहीन मी तुझा
तू अशीही असावीस
नवीनच होतं मला
actually तू शिकवलंस मला
कसं न गुंतायचं
कसं जवळ येऊनही
कसा श्वास घ्यायचा
कसा श्वास कोंडूनही
आणि कसं तळमळायचं
कसं सुखात राहूनही
आभारी राहीन मी तुझा
तू दिलेल्या संगतीला सांत्वने कमी पडावीत
तू दिलेल्या शब्दांची कंकरे का व्हावीत
मी शोधणं सोडून दिलंय आता
वाढलेल्या धडधडींचे धडे झालेत आता
आभारी राहीन मी तुझा
Relations असेही असतात
मी मोजणं सोडून दिलंय आता..

- रोहित