Saturday, 15 September 2012

तुझ्या काही मधुर आठवणी...

तुला माहितीये
मला खूप आवडायचीस तू..
अगदी मनापासून...
तू जवळ असलीस
की तुलाच पाहत राहायचो
वेड्यासारखं..
टेकडीवरच्या देवीसारखं..
बहाणे असायचे सारे
तुझ्याभोवती असण्याचे..
काही तुलाही कळलेले..

काही मलाही न कळलेले..
आठवतंय तुला,,
एकदा वही नेलेली तुझी
वर्गाबाहेर थांबून वाट पाहिलेली तुझी.. :)
मांजराचं कव्हर असलेली,
तुझी वही..
अभ्यास केला नाहीच
वहीच निरखली फार...
कव्हरवरची काळी गुब्बू मांजर..
आणि तुझं अक्षर..
दोन्ही पण सुरेख..
आठवतंय मला..
लेडी बर्ड वरून यायचीस.,,
तुझी जांभळी लेडी बर्ड..
चेहरा पूर्ण झाकून यायचीस
आणि मग अलगद स्कार्फ काढायचीस..
केसांची घडी न विस्कटू देता..
तुझ्या अदाच दिलखुश करणाऱ्या

एकदा हसलेलीस मनमुराद
माझ्याकडे पाहून..
मस्त खळी पडलेलं हसू..
हातात चंद्र होता त्या दिवशी माझ्या..
खोलवर कुठेतरी कोरलंय ते आता..
ते चार दिवस तुझे,
जुळून आलेले..
माझ्यासोबतचे....
तुझं माझं बोलणं
गच्चीवरचं.. चांदण्यातलं..
थोडं जमलेलं.. थोडं अडखळलेलं...
खोलवर कुठेतरी जिरलंय ते आता..
अशा बऱ्याच ठेवी राहिल्यात तुझ्या
माझ्यापाशी...
तुझ्याही बहुधा नकळतच....
.. काय फरक पडतो म्हणा
आठवणीच शेवटी..
तुझ्या काही मधुर आठवणी...

- रोहित

No comments:

Post a Comment