Friday, 28 September 2012

बर्फी

काही नाही रे बर्फी
सगळं असंच असतं बघ
नाही नाही म्हणतील
पण शेवटी पैसाच असतो बघ
प्रेम करणं कुणावर मरणं
दुर्मिळ झालंय बघ
आणि कुणी जर केलं
त्याचं कारणच आगळं बघ
लोक येतील, दोन तास बघतील
डोळे पुसतील बघ
बाहेर येऊन पैसे द्यायला
पाकीटच लागतं बघ
प्रेमावारती चालवून घ्यायचे
दिवसच संपलेत बघ
प्रेम मुळी इथे होतंच नाही
लोकांनी मनेच मारलीत बघ
जाऊ दे ना बर्फी
कशाला लांब जायचं
तुझ्याकडेच तर बघ
एवढं भोळा भाबडा बर्फी
जरा पडद्यामागे पण बघ

- रोहित

Sunday, 16 September 2012

रविवार ..

दुपारी chill मारत असताना फोन वाजला, "आपल्याला ढोलपथकाचा कार्यक्रम बघायला जायचंय, तयार राहा". माझे डोळे आधीच जड झालेले. डोळ्यांवर थोडी अधिक झोप होती. त्यानं असं विचारल्यानंतर माझ्या कानात आपसूक ढोल पथक वाजू लागलं. ढाण ढाण करत माझ्या झोपेचे चिंधडे उडणार असं दिसू लागलं. पण तरी आपण असं कुठं कधी पाहायला जात नाही. वरून पडला रविवार!  मन मारून का होईना पण जावं असं मनात येऊन गेलं. अर्ध्या तासांनी निघालो पण. तिथे पोचतो तर तिकीट आधीच संपलेले. मग काय करावं तर पब पासून सारसबागपर्यंत चर्चा झाली.. ती शेवटी खडकवासल्यापाशी येऊन थांबली. तिथे गाड्या लावून समोर पाहतो तर बासच..!!  का कुणास ठावूक, पण माझा मूड आणि समोरचं दृश्य यांच्यात कुठेतरी साम्य होतं. इतर वेळी कदाचित मला ते एवढं आवडलं नसतं. पण आत्ता ते स्वर्गाहूनही सुंदर भासत होतं. लांबच लांब पाणी. त्यावर चकाकणारा सूर्य पारा भासत होता. पल्याड डोंगर कडे. त्यावेळी खूप स्पर्शून गेलं मनाला ते. पाण्यात उतरण्याचा मोह अजिबात आवरता आला नाही. छोट्याश्या उसळणाऱ्या लाटा अंगावर घेत किनाऱ्यावर दगडांवर कितीतरी वेळ बसून होतो तसाच. वाटलं.. काही मनातलं सांगायचं असेल कधी.. मन मोकळं करायचं असेल कधी.. एखादी छानसी सोबत असेल कधी.., तर ह्या ठिकाणाला पर्याय नाही..! हे एकच ठिकाण असं वाटलं जिथं अजूनही लोणावळ्याची वा सिंहगडाची गर्दी झालेली नाही. मग कणीस आलं, गरमागरम भजी.. चहा.. वा..!! एवढा भारी आणि सुंदर रविवार कधी असतो का.. अजून काय हवं एका रविवार कडून. मन भरून घेतलं ह्या रविवारी मी.

- रोहित

Saturday, 15 September 2012

तुझ्या काही मधुर आठवणी...

तुला माहितीये
मला खूप आवडायचीस तू..
अगदी मनापासून...
तू जवळ असलीस
की तुलाच पाहत राहायचो
वेड्यासारखं..
टेकडीवरच्या देवीसारखं..
बहाणे असायचे सारे
तुझ्याभोवती असण्याचे..
काही तुलाही कळलेले..

काही मलाही न कळलेले..
आठवतंय तुला,,
एकदा वही नेलेली तुझी
वर्गाबाहेर थांबून वाट पाहिलेली तुझी.. :)
मांजराचं कव्हर असलेली,
तुझी वही..
अभ्यास केला नाहीच
वहीच निरखली फार...
कव्हरवरची काळी गुब्बू मांजर..
आणि तुझं अक्षर..
दोन्ही पण सुरेख..
आठवतंय मला..
लेडी बर्ड वरून यायचीस.,,
तुझी जांभळी लेडी बर्ड..
चेहरा पूर्ण झाकून यायचीस
आणि मग अलगद स्कार्फ काढायचीस..
केसांची घडी न विस्कटू देता..
तुझ्या अदाच दिलखुश करणाऱ्या

एकदा हसलेलीस मनमुराद
माझ्याकडे पाहून..
मस्त खळी पडलेलं हसू..
हातात चंद्र होता त्या दिवशी माझ्या..
खोलवर कुठेतरी कोरलंय ते आता..
ते चार दिवस तुझे,
जुळून आलेले..
माझ्यासोबतचे....
तुझं माझं बोलणं
गच्चीवरचं.. चांदण्यातलं..
थोडं जमलेलं.. थोडं अडखळलेलं...
खोलवर कुठेतरी जिरलंय ते आता..
अशा बऱ्याच ठेवी राहिल्यात तुझ्या
माझ्यापाशी...
तुझ्याही बहुधा नकळतच....
.. काय फरक पडतो म्हणा
आठवणीच शेवटी..
तुझ्या काही मधुर आठवणी...

- रोहित

Friday, 7 September 2012

हे तुला न समजत कसे..

शोधत असतो मी तुला
तुझ्या नेहमीच्याच वळणांवर
आणि आजकाल असतं फक्त शोधणं
विसरलोय मी काही सापडणं

त्रास तुलाही, त्रास मलाही
उगाच फुसकं गुरगुरणं
सवय तुझी जुनाट खोडी
मनात काळं भिरभिरणं

खेळ सोडायचे अर्ध्यावर
तरी उगाच फेकले फासे
आणि आलो तरी मी मागावर
हे तुला न समजत कसे

तडफड तडफड
नुसतीच चरफड
वैताग आलाय नुसता
आणि मी न येणार मागे आता
अश्या मी खाल्ल्या खस्ता

चालू देत खेळ तुझे
चालु दे जीवांचे घोर
मी बाहेर पडणार आता
मी यातून बाहेर पडणार आता..
तुझ्या प्रेमाच्या झळा
मला न सोसणे आता

- रोहित