Friday, 9 January 2015

काही गोष्टी..

मुसळधार पाऊस.. तसा कमी झालाय आता
आकाशातील ढगही विरळ केव्हाच झालेत
कधीकाळचं घोंगावलेलं..  रानभर पांगलेलं वादळ
आता शांत झालंय..
लोक दिनचर्येत आलेत.. वाहने रस्त्यांवर आहेत
सगळं आता कसं आलबेल आहे
जसं ते या वादळापूर्वीही होतं..
विसरत चाललाय प्रत्येकजण
दीर्घ अनुभवातला एक एक क्षण
कि काहीतरी जुनं होऊन गेलंय या नगरीत
कुणी या पावसात मनसोक्त भिजलेलं
तर कुणी आडोसा घेऊन थांबलेलं
कुणाला आठवायच्याही नाहीयेत या गोष्टी
परत ती जुनी वेळ झुरवायची नाहीये
भलेही अभिनव का करावा लागेल मग
पण कसं असता ना.. नाही लपवता येत प्रत्येकालाच अश्या गोष्टी
लपवलं जरी तरी परीक्षा पाहतात या गोष्टी
पावसात भिजून कोरडे असल्याचा अभिनय
नाही जमत प्रत्येकालाच..
दिसतात काही गोष्टी डोळ्यातूनही
फक्त जरा खोलवर पाहण्याची परवानगी मिळावी..
आणि करावा मग लोकांनीही स्वीकार
कि आहे प्रेम कुणा वेड्याचं ह्या पावसावर
त्याने वेळ दिलाय ह्या पावसाला
थोडा वेळ तर लागेलच ना..
आणि नाहीच जमलं त्या वेड्याला असं विसरणं
तर सोडून द्यावं मग त्याला त्याच्याच नशिबी ..
तो झुरेल एकटाच.. त्याच्यापुरतं समाधान त्याचं त्यालाच
कराव्यात लोकांनीही मंजूर
कधी असल्याही गोष्टी
असतात कुणी वेडे
कधी शहाण्यांच्याही नगरी

- रोहित