Saturday, 7 June 2014

पाऊस रात्रीचा..

बारीकशी रिमझिम बाहेर पावसाची
जमिनीवर पडणारे पावसाचे सततचे थेंब
अन मधूनच उमटणारी गडगडाटाची चाहूल
पावसाळा चालू झाल्याची पुसटशी कल्पना
मी वाट पाहत असतो कायम या पावसाची
सोबत घेऊन येणाऱ्या खोलवर नेणाऱ्या क्षणाची
स्वत:शीच थोडं बोलणं, खोलवर पाहणं होऊन जातं
चार गोष्टी समजून थोडं उमजनं होऊन जातं
धावपळ चालू असतेच की आपली तशी कायम
पण एक निवांत उसासा हा पाऊस देऊन जातो
जवळ असेल त्याला थोडी उसंत देऊन जातो
जवळ कुणी नसल्याची कधी खंत देऊन जातो
हा पाऊस कायम असावा असं एकदा वाटून जातं
चार क्षण सुखाचे माणूस आपल्यात गढून जातो
अन रात्रीच्या वेळी हा पाऊस असा पडावा
खोलवर मनाशी जसा पाण्याच्या शिडकावा
सोबतीला असावी रातकीड्यांची वस्ती
आणि मनाला रिझवेल मग हलकीशी सुस्ती 
एक पाऊस मात्र कधी असाही वाटतं पडेल
जो कुणालातरी आठवून कधी आपल्यासोबत रडेल

- रोहित